दिल्लीतील दिलशाद गार्डन कॉलनीत राहणाऱ्या वर्मा कुटुंबीयांसाठी गुरुवारची रात्र काळरात्र ठरली. १२ वर्षाच्या हर्षूचा वाढदिवस साजरा करुन झोपलेल्या वर्मा कुटुंबांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. विजय वर्मा (वय ६३), संजय वर्मा (४५), हर्षू (१२) आणि चिकू (४) अशी या मृतांची नावे असून आगीत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
दिलशाद गार्डन कॉलनीतील तीन मजली इमारतीत राहणाऱ्या वर्मा कुटुंबीयांच्या घरी गुरुवारी उत्साहाचे वातावरण होते. संजय वर्मा यांची मुलगी हर्षूचा वाढदिवस होता. संध्याकाळी घरात वाढदिवस जल्लोषात साजरादेखील करण्यात आला. मात्र हा हर्षूचा शेवटचा वाढदिवस असेल असे कोणालाही वाटले नव्हते. शुक्रवारी पहाटे इमारतीच्या तळमजल्यावर राहणाऱ्या वर्मा यांच्या घराबाहेरील इलेक्ट्रीक जंक्शन बॉक्समध्ये आग लागली. आग झपाट्याने पसरत गेली आणि वर्मा यांच्या घरालाही आगीने घेरले. आगीत वर्मा कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले. मोना वर्मा (३२) आणि विनेश राठी (४०) अशी जखमींची नावे आहेत. मोना या ४० ते ५० टक्के भाजल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्यावर दिल्लीतील गुरु तेज बहाद्दर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून आगीत इमारतीच्या परिसरातील ९ वाहनांचे नुकसान झाले आहे.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पहाटे तीनच्या सुमारास अग्निशमन दलाच्या कार्यालयाला आगीची माहिती मिळाली. यानंतर अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी दाखल झाले. तीन मजली इमारतीमध्ये आग वेगाने पसरत होती. आम्ही तातडीने बचावकार्य राबवत उर्वरित कुटुंबीयांची सुटका केली. सकाळी पाचच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले.
