शेतकऱ्यांच्या नावे ३२८ कोटींचे कर्ज घेणाऱ्या रत्नाकर गुट्टेंविरोधात गुन्हा दाखल

बनावट कागदपत्रांच्या मदतीने शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेतल्याप्रकरणी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि उद्योगपती रत्नाकर गुटे यांच्या विरोधात परभणी जिल्ह्यातील गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला गेला. मराठवाड्यातील १५ हजार शेतकऱ्यांच्या नावावर गुट्टे यांनी तब्बल ३२८ कोटी रुपयांचं कर्ज उचललं होतं. विशेष म्हणजे याबद्दल संबंधित शेतकऱ्यांना कल्पनादेखील नव्हती.

गुट्टे यांनी आंध्र बँक, युको बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक आणि रत्नाकर बँक या सहा बँकांच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या मदतीनं शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज उचललं होतं. गुट्टेंच्या मालकीच्या गंगापूर शुगर अँड एनर्जी लिमिटेड या खासगी साखर कारखान्यानं शेतकऱ्यांच्या नावानं हे बोगस कर्ज उचललं आहे. सहा राष्ट्रीयकृत आणि एका खाजगी बँकेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा सारा व्यवहार झाल्याचं उघडं झालं आहे. रत्नाकर गुट्टे यांनी युनायटेड बँक ऑफ इंडियामधून ७६.३२ कोटी, युको बँकेतून ४७.७८ कोटी, बँक ऑफ इंडियामधून ७७.५९ कोटी, आंध्रा बँकेतून ३९.१७ कोटी, सिंडिकेट बँकेतून ४७.२७ कोटी आणि रत्नाकर बँकेतून ४०.२० कोटींचे कर्ज घेतले आहे.

 रत्नाकर गुट्टे हे परळी तालुक्यातील दैठणाघाट येथील रहिवाशी आहेत. त्यांच्या पत्नी सुधामती गुट्टे राष्ट्रवादीच्या महिला सरचिटणीस होत्या. अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे गुट्टे पंकजा मुंडे यांच्याशी चांगले संबंध आहेत. रत्नाकर गुट्टे यांनी महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून मागील विधानसभा निवडणूक लढवली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *