काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा आज (सोमवार) वाढदिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिला. मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये शुभेच्छा देताना राहुल गांधींना दीर्घायू लाभो, अशी इच्छा व्यक्त केली.
‘काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना दीर्घायू आणि आरोग्यदायी जीवन लाभो,’ असे ट्वीट मोदींनी केले.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज (सोमवार) ४७ वर्षांचे झाले. सध्या ते विदेशात आजी आणि इतर नातेवाईकांबरोबर सुटीवर आहेत. विदेशात जाण्यापूर्वी त्यांनी स्वत:च ट्वीटरवरून याची माहिती दिली होती.
पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त इतर नेत्यांनीही राहुल यांना ट्विट करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरवर #HappyBirthdayRG हा ट्रेंड सुरू आहे.
