जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या हल्ल्यांत दोन पोलीस शहीद झाले आहेत. तर एक जखमी झाला आहे. दहशतवाद्यांनी काल रात्री श्रीनगरमधील हैदरपोरा येथे पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात दोन पोलीस गंभीर जखमी झाले होते. त्यांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गंभीर जखमी झालेले कॉन्स्टेबल शहजाद यांचा मृत्यू झाला. तर दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात घराबाहेरच पोलीस दलातील शबीर अहमद यांना गोळ्या घातल्या. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.
गेल्याच महिन्यात कुलगाम जिल्ह्यात लेफ्टनंट उमर फयाज यांचे अपहरण करून त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. फयाज हे आपल्या नातेवाईकाच्या घरी लग्न असल्याने सुट्टीवर होते. त्याचवेळी दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण करून हत्या केली. गेल्या महिन्यातही हिज्बुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांनी कुलगामध्ये हल्ला केला होता. या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला होता. त्यात पाच पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. बँकेच्या कॅश व्हॅनमधून त्यांना बाहेर काढले आणि त्यांची हत्या करण्यात आली होती.
