प्रेयसीने प्रियकरावर अॅसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास गोरेगाव पश्चिमेकडील हिरेन शॉपिंग सेंटरजवळ घडली. गोरेगाव पोलिसांनी हल्लेखोर तरुणीला अटक केली. मीरा शर्मा (२५) असे या तरुणीचे नाव असून ती नालासोपरा परिसरात राहते. या हल्ल्यात प्रियकर ओमसिंग सोलंकी (२६) जखमी झाला असून शताब्दी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सोलंकीच्या चेहऱ्यावर, दोन्ही हातांवर भाजल्याच्या जखमा आहेत.
सोलंकी गोरेगाव परिसरातील एका दुकानात सेल्समॅन आहे. पोलिसांच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार अलीकडेच मीरा व ओमसिंग यांच्यातील प्रेमसंबंध तुटले. काही दिवसांनंतर मीराने संबंध पुन्हा जोडण्यासाठी प्रयत्न केले.
मात्र ओमसिंगकडून तिला प्रतिसाद मिळत नव्हता. ओमसिंग तिचे फोनही उचलत नव्हता. गुरुवारी ओमसिंग ज्या दुकानात काम करतो तेथे मीरा धडकली. दोघांमध्ये वाद सुरू झाला. अचानक मीराने सोबत आणलेल्या छोटय़ा बाटलीतील अॅसिड ओमसिंगच्या दिशेने भिरकावले.
