देशातील ८१ लाख लोकांनी तंबाखू, सिगारेट सोडली!

तंबाखूजन्य पदार्थाच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण होत आहे. २०१६-१७ मध्ये देशातील ८१ लाख लोकांनी तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाच्या विळख्यातून स्वतःची सुटका करून घेतली आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनात जवळपास सहा टक्क्यांनी घट झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्वेनुसार (जीएटीएस) देशातील १५ ते २४ वयोगटातील तरुणांमधील तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनात ६ टक्क्यांची घट झाली आहे. २००९-१० मध्ये हे प्रमाण १८.४ टक्के होते. ते २०१६-१७ मध्ये १२.४ टक्क्यांवर आले आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत तरुणांमध्ये जागृती निर्माण होत असून, ८१ लाख तरुणांची तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनापासून मुक्तता झाली आहे. ही आनंदाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी दिली. नड्डा यांना नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालक विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले. तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या सेवनावर नियंत्रण आणण्यासाठी केलेल्या भरीव कामगिरीबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तंबाखू सेवनावरील नियंत्रणासाठी ‘कॅच देम यंग’ हा माझा मंत्र आहे. तंबाखू सेवन करणाऱ्या १५ ते १७ वयोगटातील अल्पवयीनांच्या प्रमाणात ५४ टक्के, तर १८-२४ वयोगटातील तरुणांच्या प्रमाणात २८ टक्के घट झाली आहे. हे सांगण्यास मला अत्यंत आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया नड्डा यांनी हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिली.

दरम्यान, दरवर्षी भारतात तंबाखूजन्य पदार्थांच्या अतिसेवनामुळे १२ लाख लोकांचा मृत्यू होत आहे. याचाच अर्थ देशात तासाला १३८ लोकांचा मृत्यू होतो, अशी धक्कादायक माहिती आरोग्य मंत्रालयाच्या ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्वेच्या आकडेवारीतून समोर आली होती. देशात ३५ टक्के (४८ टक्के पुरुष, २० टक्के महिला) तंबाखूचे सेवन करतात. नड्डा म्हणाले की, तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर नियंत्रण मिळवण्याच्या दिशेने काम केले जात आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या पाकिटावरील दोन्ही बाजूला तंबाखूतून उद्भवणाऱ्या भीषण अपायांची सूचना मोठ्ठाल्या चित्रांसह देण्यात आली आहे. तसेच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे, असे नड्डा यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *