महिलेवर सामूहिक बलात्कार, मुलीला रिक्षेतून फेकलं

शेजाऱ्यांशी भांडण झाल्यामुळे आपल्या ८ महिन्यांच्या मुलीला घेऊन माहेरी जायला निघालेल्या एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. इतकंच नाही तर रिक्षेत बसलेल्या महिलेच्या हातातून तिच्या आठ महिन्याच्या मुलीला खेचून आरोपींनी चालत्या रिक्षेतून तीला बाहेर फेकून दिलं. त्यावेळी फुटपाथवर डोक आपटलं गेल्यानं त्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला आहे. नंतर त्या नराधमांनी एका सामसूम जागी रिक्षा थांबवून महिलेवर सामूहिक बलात्कार करून ते पळून गेल्याचं समोर आलं आहे.
पीडित महिला आपल्या पतीसोबत बासकुसला गावात राहणारी होती. 29 मे रोजी रात्रीच्या सुमारात तिच्या पतीचं शेजाऱ्यांशी जोरदार भांडण झालं. त्यानंतर नाइट शिफ्ट असल्याने तो कामावर निघून गेला. पीडित महिलेचा पती कामावर गेल्याचं पाहून शेजाऱ्यांनी पुन्हा महिलेशी भांडण सुरू केलं. भांडणाला कंटाळून महिला आपल्या आठ महिन्यांच्या मुलीला घेऊन माहेरी जाण्यासाठी निघाली होती. ती आयएमटी चौकात पोहचली. पण रात्री रस्त्यावर कोणतंही वाहन न दिसल्याने तिने एका ट्रकवाल्याकडून लिफ्ट मागितली. ट्रकमध्ये बसल्यावर चालकाने महिलेची छेडछाड सुरू केली. शेवटी ती महिला पुढे खेडकीदौला टोलनाका येताच उतरून गेली. टोलनाक्यावरून तिने एक रिक्षा पकडली होती. त्या रिक्षेत आधीच तीन तरुण बसले होते. तरीही माहेरी लवकर पोहोचता यावं म्हणून ती महिला त्या रिक्षेत बसली. मुलीला मांडीवर घेऊन रिक्षेमध्ये बसताच त्या तीन तरुणांनी महिलेची छेड काढायला सुरुवात केली. तिने आरडाओरडा सुरू करताच तिची मुलगीही घाबरून रडायला लागली. त्याबरोबर त्या तरुणांनी मुलीला महिलेकडून खेचून घेत चालत्या रिक्षेतून फेकून दिलं. त्यानंतर एका अज्ञात जागी रिक्षा थांबवून महिलेवर सामूहिक बलात्कार करून ते पळून गेल्याचा आरोप महिलेने केला आहे. तशाच अवस्थेत पीडित महिला माहेरी पोहचली.  याप्रकरणी पीडित महिलेने आयएमटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात मुलीच्या खुनाचा गुन्हा नोंदविला.  पण हे सगळं सुरू असताना त्या महिलेने तिच्यावर बलात्कार झाला असल्याचं सांगितलंसुद्धा नाही. दोन दिवसांनी तिने  याविषयी आपल्या पतीला सांगितल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *