फिलिपिन्सची राजधानी मनिलामधील एका कॅसिनोमध्ये झालेल्या गोळीबारात ३४ लोकांचा मृत्यू झाला आहे. लूटमार करण्याच्या उद्देशाने हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. गोळीबार केल्यानंतर अज्ञात व्यक्तीने स्वत:वर गोळी झाडली, अशा माहिती पोलिसांनी दिली आहे. गुरुवारी मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली.
मनिलामधील मनिला एंटरटेनमेंट कॉम्प्लेक्समध्ये गोळीबाराची घटना घडली. अज्ञाताने गोळीबार केल्यानंतर कॅसिनोमध्ये एकच गोंधळ झाला. यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाला. यासोबतच संपूर्ण कॅसिनोमध्ये धूर पसरल्यानेदेखील अनेकांना जीव गमवावा लागल्याची माहिती कॉम्प्लेक्सच्या ऑपरेटरने दिली. या हल्ल्याची जबाबदारी आयसिसने घेतल्याचे वृत्तदेखील काही संकेतस्थळांनी दिले आहे. मात्र फिलिपिन्स सरकारकडून याचा इन्कार करण्यात आला आहे.
