मुलीसाठी वडिलांनी केले यकृतदान

मुलगी नकोच म्हणणाऱ्यांपुढे एका पित्याने चांगला आदर्श ठेवला आहे. आपल्या लेकीला पित्याने यकृतदान देऊन नवसंजीवनी दिली.

मूळची रायपूरची असणाऱ्या १७ महिन्यांची मुलगी यकृताच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची सर्वांत लहान वयाची रुग्ण ठरली आहे. जन्मानंतर चार आठवड्यांत बाळाला सारखा ताप येणे, पोट फुगणे आणि कावीळ यासारखे त्रास होत असल्याचे तिच्या पालकांच्या लक्षात आले. यानंतर दुसऱ्या महिन्यातच झालेल्या तपासणीत तिला ‘बिलरी अट्रेसिया’ या गंभीर यकृताच्या आजाराचे निदान झाले. हा यकृत आणि पित्ताशय नलिकेशी संबंधित आजार आहे. वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रिया केल्यानंतर, तिच्या गावच्या डॉक्टरांनी तातडीच्या यकृत प्रत्यारोपणाचा पर्याय समोर ठेवला, यामुळे तिचे कुटुंब मुंबईत दाखल झाले.

प्रत्यारोपण हिपोटोलॉजिस्ट डॉ. सैस्टा अमिन यांनी कुटुंबाला प्रत्यारोपणाबद्दल सांगितले की, बाळाला जेव्हा आमच्याकडे आणले तेव्हा तिला कावीळ झाली होती. तिचे पोटही फुगलेले होते. तसेच पित्ताशय नलिकाही यकृतात जमा झाल्या होत्या, आणि ही परिस्थिती फार काही चांगली नव्हती. डॉ. विनय कुमारन् म्हणाले, शल्यविशारदांच्या टीमसाठी १७ महिन्यांच्या ७ किलो वजनाच्या बाळावर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करणे म्हणजे आव्हान होते. तिचे वडील तिच्यासाठी उत्तम ‘मॅच’ ठरले. ही मुलगी सर्वात लहान वयाची यशस्वी यकृत प्रत्यारोपण केली गेलेली रुग्ण ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *