बार गर्लना लपवण्यासाठी बारमध्ये बनवण्यात आलेल्या गुप्त खोल्यांवर मीरा-भाईंदर महापालिकेने कारवाई केली. सलग दोन दिवस पाच बारवर कारवाई करत आतापर्यंत सात गुप्त खोल्या नेस्तनाबूत केल्या आहेत. या पाचही बारच्या मालकांविरोधात एमआरटीपी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
ऑर्केस्ट्राच्या नावावर मीरा-भाईंदर परिसरात डान्स बार चालत असल्याने पोलिसांच्या कारवाईपासून बार्ल गर्लना लपविण्यासाठी या बारमालकांनी नामी शक्कल लढवली. बारमध्ये फेराफार करून त्यात बार गर्लना लपवण्यासाठी गुप्त खोल्या बनवल्या होत्या.
पोलीस छापा मारायला जाताच या बार गर्लना या खोल्यांमध्ये लपवलं जात होतं. ठाणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांनी या खोल्या नेस्तनाबूत करण्याची मागणी पालिकेकडे केली आणि पालिकेने दहिसर चेक नाका ते काशी-मीरा रोडपर्यंत सर्व बारची तपासणी करून धडक कारवाई केली.
आतापर्यंत पाच बारमधील पालिकेने सात गुप्त खोल्या तोडून टाकल्या आहेत. त्यात मंत्रा बार, मेमसाब बार, मॅक्ट्रिक्स बार, सी-मॅजिक बार, आणि कशिश बार यांचा समावेश आहे.