वरदाह चक्रीवादळाचा फटका राज्यातील शेतीला, अचानक पावसाची हजेरी

वरदाह वादळं शमले असले त्याचा परिणाम आता महाराष्ट्रात पाहायला मिळतोय. कोकण आणि मराठवाड्यात अचानक पावसाने हजेरी लावलीय. ढगाळ वातावरणामुळे थंडीचा जोर ओसरला असून रब्बीच्या पिकावर कीड आणि रोगाचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे.

वरदाह चक्रीवादळाचा फटका राज्यातील शेतीला बसला आहे. कोकण आणि मराठवाड्यात अचानक आलेल्या पावसामुळे रब्बी पिकांचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे. कोकणात आंब्याच्या बागांना पावसाने झोडपलंय तसेच ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोग आणि किडीचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वातावरणात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात वातावरण ढगाळ राहणार आहे.  दक्षिण मध्य महाराष्ट्र, तळ कोकणात ढगाळ वातावरण असणार आहे.  १८ डिसेंबरपर्यंत थंडीचा जोर कमी असणार आहे. मात्र त्यानंतर थंडी चा जोर वाढणार आहे, अशी माहिती  कुलाबा वेधशाळा संचालक शुभांगी भुत्ते  यांनी दिली.

वातावरणात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने विदर्भ वगळता उर्वरीत महाराष्ट्रातील थंडीचा जोर  कमी झाला आहे. किमान तापमानात १ ते ३ अंश सेलसिअसने वाढ झाली आहे.  आगामी  चार ते पाच दिवसानंतर उत्तर पूर्व वा-यामुळे उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार आहे. ही सगळी परिस्थिती लक्षात घेवून शेतक-यांनी रब्बीच्या पिकाचं नियोजन करण्याची आवश्यकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *