नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरजवळच्या तळेगाव गावात १६ वर्षाच्या मुलाने पाच वर्षीय मुलीवर अतिप्रसंग केल्याच्या घटनेने जिल्ह्यातील वातावरण संतप्त बनले आहे. अत्याचारप्रकरणानंतर धुमसणारा नाशिकमधील तणाव अद्यापही कायम आहे.
नाशिकमध्ये मंगळवारी रात्री काही भागात दगडफेकीचे प्रकार घडले. यामुळे कोणत्याही अफवा पसरू नयेत यासाठी तिस-या दिवशीही नाशिकमधील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. तसेच नाशिक शहरातील बससेवा आणखी काही काळ बंद ठेवण्यात येणार असून आता मद्य दुकानेही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी यासंदर्भात माहिती दिली.
तळेगावमधील अत्याचार घटनेचे नाशिक परिसरात तीव्र पडसाद उमटले. रविवारी काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. त्याच पार्श्वभूमीवर वातावरण चिघळू नये, अफवा पसरवू नयेत यासाठी मोबाईल डेटा आणि इंटरनेट सेवा दोन दिवसांसाठी खंडीत करण्यात आली होती. मात्र या घटनेला तीन दिवस झाल्यानंतरही शहरातील तणाव अद्याप कायम आहे. मंगळवारी रात्री नाशिकमधील काही भागात दगडफेकीचे प्रकार घडल्याने या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने इंटरनेट बंदीचा कालावधी वाढवला आहे. सोशल मीडियावरुन अफवा, प्रक्षोभक मजकूर पसरु नये हा यामागचा उद्देश आहे.
दरम्यान, एसटीची नाशिकहून मुंबईकडे जाणारी वाहतूकही बंद ठेवण्यात आली आहे. मंगळवारी रात्री नाशिकमध्ये एसटी बसचे नुकसान झाल्यामुळे एसटी व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. धुळे विभागाच्या चार बसचे नुकसान झाले आहे.