प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र त्यांच्या प्रकृतीत अजूनही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे भुजबळ यांच्या अद्ययावत चाचण्या करण्यासाठी त्यांना अन्य रुग्णालयात हलवण्यात येणार असल्याची समजते आहे.
छगन भुजबळ यांना अस्वस्थ वाटू लागल्याने सप्टेंबर महिन्यात ऑर्थर रोड कारागृहातून जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोकेदुखी, अंगदुखीचा त्रास त्यांना होत होता. सततचा ताप आणि प्लेटलेट्स प्रमाण कमी झाल्याने त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आल्या. मात्र बरेच दिवस उलटून गेल्यानंतरही भुजबळ यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांच्या काही विशेष चाचण्या कराव्या लागणार आहेत. पण जे.जे. रुग्णालयात आवश्यक त्या आधुनिक सुविधा नसल्यामुळे त्यांना अन्य रुग्णालयात हलवण्यात यावे, असे जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितल्याचे समजते आहे.
रुग्णालयाकडून तुरूंग प्रशासनाला याबाबत पत्र पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे येत्या २-३ दिवसांतच भुजबळ यांना अन्य रुग्णालयात दाखल करण्यात येईल असे समजते आहे.