पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचे बिंग फुटले!

कुपवाडा जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा प्रयत्न फसला असला तरी (एनआयए) राष्ट्रीय तपास यंत्रणेने याची गंभीर दखल घेऊन एफआयआर दाखल केला आहे. या हल्ल्यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले होते.

एनआयएच्या पथकाने घटनास्थळी जाऊन लष्कराच्या मदतीने हल्ल्यासंबंधी पुरावेही गोळा केले आहेत. उत्तर काश्मीरच्या लेनगेट येथे लष्कराच्या हल्ल्यात ठार तीन दहशतवाद्यांचे शवही हस्तगत करण्यात आल्याचे कार्यालयीन माहीतगाराने सांगितले. जवळपास पाच तास उडालेल्या या चकमकीत लष्कराच्या प्रतिहल्ल्यात ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांचे डीएनए नमुनेही एनआयएने तपासणीसाठी पाठवले आहेत.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (जीपीएस सिस्टम) मोबाईल फोन, नकाशा आणि मेट्रिक्स शिटद्वारे दहशतवाद्यांनी कोडवर्ड वापरून पाठवलेल्या संदेशाची पडताळणी केली आहे. लष्कराने या दहशतवाद्यांकडून एके राईफल्स, तीन बॅरेल ग्रेनेड लाँचर, काडतुसे आणि वॉकी-टॉकीचे चार सेट, ड्रायफ्रुट्स आणि औषधे हस्तगत केले होते.

या तीन दहशतवाद्यांकडून हस्तगत केलेली औषधे पाकिस्तानात तयार करण्यात आल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे हे तीनही दहशतवादी पाकिस्तानी असल्याचा दावा भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिका-यांनी केला आहे. जम्मू-काश्मीरच्या उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर तीन आठवडय़ांत गुरुवारी दहशतवाद्यांनी लष्करी तळावर हल्ला चढवला होता. मात्र भारतीय लष्कराच्या जवानांनी बाळगलेल्या सतर्कतेमुळे अतिरेक्यांचे मनसुबे उधळले गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *