दस-याच्या पूर्वसंध्येला ठाण्यात एका तरुणाने साडेचार वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार केल्याची घटना घडली आहे. शिवाजी धाडवे (२४) असे या नराधमाचे नाव असून तो पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या किसननगर भागात राहणारा आहे. तो युवा सेनेचा कार्यकर्ता असल्याचेही बोलले जात असून या प्रकारानंतर श्रीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. मंगळवारी न्यायालयाने त्याला १५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ठाण्याच्या वागळे इस्टेट, किसननगर भागातील साईनाथवाडी चाळीत राहणा-या शिवाजीच्या बाजूला पीडित मुलगी तिच्या परिवारासह वास्तव्यास होती. सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता या मुलीची आई या मुलीला आणि आणि तिच्या भावाला घरात ठेवून बाहेरून कडी लावून भाजी आणण्यासाठी गेली होती. यादरम्यान शेजारी राहणा-या शिवाजीने या मुलीला स्वत:च्या घरात आणून पोटमाळ्यावर नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. यानंतर मुलीची आई जेव्हा घरी परतली तेव्हा मुलीने रडत रडत हा प्रकार तिच्या आईला सांगितला.
याप्रकरणी मुलीच्या आईने श्रीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी शिवाजीविरोधात बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचारविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला १५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शिवाजी हा या भागातील युवा सेनेचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे. त्याच्या फेसबुक अकाउंटवर एकनाथ शिंदे यांच्यासह फोटो असून युवासेनेचे काही बॅनरही अपलोड करण्यात आले आहेत. या प्रकारानंतर किसननगर भागात तणावाचे वातावरण आहे. स्थानिकांनी त्याला पोलीस ठाण्याच्या आवारातच बेदम चोपल्याचेही सांगितले जात आहे.