मुलुंडमधील भाजपाच्या कार्यक्रमात धुडगूस घालणा-या पाच शिवसैनिकांना नवघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच आणखी काही शिवसैनिकांना अटक होण्याची शक्यता आहे.
किरण नंदी, निलेश सावंत, सुनील सतुंगरे, निलेश ठक्कर, किशोर भोईर या पाच जणांची पोलीस कसून चौकशी करत आहेत.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यक्रमात शिरून रावणाच्या प्रतिकृतीची मोडतोड करत भाजपाच्या कार्यकर्त्यांना लाठ्याकाठ्यांसह मारामारी, धक्काबुक्की केली. यावेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले.
या हल्लेखोर गुंडांना अटक होईपर्यंत मी जागेवरून हलणार नाही, असा निर्धार सोमय्या यांनी केला. तर हे गुंड नव्हे तर ही शिवसेनेची प्रतिक्रियाच असल्याचे सांगत शिवसेनेचे विभागप्रमुख दत्ता दळवी यांनी पुन्हा असे केल्यास सोमय्यांना दिसेल तिथे ठोकून काढू, असा इशारा प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला होता.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुलुंड मधील आजचा नियोजित दौरा रद्द करण्यात आला आहे.