भारतीय वायू सेना पाकिस्तानला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. पाकिस्तानला चीनने पाठिंबा दिला तर दोन्ही देशांचा सामना करण्याची क्षमता वायूसेनेत आहे, असं वायू सेना प्रमुख अरुप राहा यांनी ‘एबीपी न्यूज’शी बोलताना सांगितलं.
वायूसेनेचं बळ 1962 च्या युद्धाच्या तुलनेत आता किती तरी पटीने वाढलं आहे. शत्रूंना केवळ रोखणंच नाही तर हल्ला झाल्यास त्यांचा सामना करणंही वायूसेनेचं काम आहे. 1962 च्या युद्धात परिस्थिती वेगळी होती. यावेळी चीन आणि पाकिस्तान एकत्र झाले तरीही त्यांचा सामना करु, अशा शब्दात राहा यांनी कडक संदेश दिला.
वायूसेनेकडे गेल्या काही वर्षात अनेक अत्याधुनिक प्रकारचे विमान दाखल झाले आहे. स्वदेशी आणि परदेशी बनावटीच्या अॅवॉक्स रडारमध्ये शत्रुंना शेकडो किलोमीटरवरुन ओळखण्याची क्षमता आहे. शिवाय राफेल विमानही वायूसेनेच्या ताफ्यात दाखल होत आहेत, त्यामुळे वायूसेनेचा आत्मविश्वास वाढला असल्याचं राहा यांनी सांगितलं.