पुणे: ओव्हरलोड वाहनांवर ‘आरटीओ’ची कारवाई

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणार्‍या 642 वाहनांवर  कारवाई केली. ही कारवाई 1 एप्रिल ते 31 ऑगस्ट या कालावधीत करण्यात आली असून, या कारवाईत तब्बल 1 कोटी 22 लाख 27 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच कारवाई करण्यात आलेली 165 वाहने जप्त करण्यात आली आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत वाहनांवर  केलेल्या कारवाईत तब्बल 2 कोटी 63 लाख 17 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता.
परिवहन कायद्यानुसार कोणत्याही माल वाहतूक करणार्‍या वाहनाला ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक करता येत नाही. त्यामुळे आरटीओ आपल्या हद्दीतील माल वाहतूक करणार्‍या वाहनांवर लक्ष ठेवत असते. मात्र, अनेकदा मालवाहतूक करणारी वाहने एक्स्प्रेस-वे आणि इतर मार्गावर क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक करताना दिसतात. त्यामुळे ‘आरटीओ’च्या पथकाकडून अशा वाहनांवर कारवाई करण्यात येते.
‘आरटीओ’तर्फे केलेल्या कारवाईत 1 एप्रिल ते 31 ऑगस्टपर्यंत तब्बल 4 हजार 697 वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणारी 642 वाहने दोषी आढळून आली. या वाहनांवर कारवाई करताना ‘आरटीओ’ने 165 वाहने जप्त केली. उर्वरित वाहनांवर कारवाई करताना त्यांच्याकडून 90 लाख 23 हजारांचा तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.
      तसेच 32 लाख 23 हजारांचे विभागीय तडजोड शुल्क वसूल केले. त्यामुळे तडजोड व विभागीय तडजोड शुल्क मिळून ‘आरटीओ’ने माल वाहतूकदारांकडून एकूण 1 कोटी 22 लाख 27 हजारांचा दंड वसूल केला आहे.
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाप्रमाणेच पिंपरी-चिंचवड परिवहन कार्यालयातर्फे क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणार्‍या वाहतूकदारांकडून 78 लाख 60 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.  गेल्या पाच महिन्यांमध्ये पिंपरी-चिंचवड ‘आरटीओ’ने 786 माल वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई करून 78 लाख 60 हजारांचा दंड वसूल केला आहे.
       तसेच सोलापूर ‘आरटीओ’ने 1 कोटी 3 लाख 24 हजार, बारामती
‘आरटीओ’ने 68 लाख 95 हजार तर, अकलूज ‘आरटीओ’ने 80 लाख 72 हजारांचा दंड वसूल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *