परतीच्या पावसाने आज (शनिवार) सकाळपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये दमदार हजेरी लावली आहे. विशेषत:, मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर जास्त आहे. मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे.
लातूर जिल्ह्यावर परतीच्या पावसाची कृपादृष्टी कायम आहे. या जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी 802.13 मिलिमीटर आहे आणि यंदा आतापर्यंत सरासरी 993.22 मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील धरण प्रकल्प, नद्या-नाले तुडुंब भरले आहेत. शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जळकोटमध्ये अनेक घरांचे नुकसान झाले. या तालुक्यातील बोरगाव येथे ब्रम्हादेवाचे मंदिर पाण्याखाली गेले आहे. मराठवाड्यात लातूरसह नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवारी रात्रभर पाऊस पडत होता. जळकोटसह चाकूर, निलंगा, रेणापूर, अंबाजोगाई, माजलगाव, तुळजापूर, उस्मानाबाद, भूम तालुक्यांत पावसाचा जोर जास्त आहे. पहाटेपासूनच्या मुसळधार पावसामुळे आरखेड, घोडा, उमरथडी, सोमेश्वर, फळा, सायाळ, पुयणी, आडगाव, वनभुजवाडी या गावांचा संपर्क सकाळपासून तुटला आहे.