दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) छतावर गेल्या पंधरा वर्षांपासून तिरंगा डौलाने फडकत असून, येथील विद्यार्थ्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.
जेएनयूमध्ये नऊ फेब्रुवारीच्या रात्री पाकिस्तानच्या घोषणा दिल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशातील सर्व म्हणजे 46 केंद्रीय विद्यापीठांत रोज तिरंगा फडकावण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. सर्व विद्यापीठांत 207 फूट उंच स्तंभावर रोज तिरंग्याला वंदन करणे बंधनकारक व अनिवार्य राहील, असे ठरविण्यात आले होते. या निर्णयानंतर समोर आले आहे, की जेएनयूमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून तिरंगा फडकत आहे. सर्व विद्यापीठात तिरंगा फडकाविण्याच्या कामास अंदाजे 45 लाख रुपये खर्च असल्याचे सांगण्यात येत आहे.
‘जेएनयू‘मध्ये देशविरोधी व दहशतवाद्यांचे गुणगान करणाऱ्या घोषणा दिल्या गेल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. हा विषय “राष्ट्रभक्ती‘ व “देशद्रोही‘ या अंगाने नेल्यास जुळणारी गणिते सरकारच्या लक्षात येऊ लागल्याचे हे पहिले द्योतक असल्याचे जाणकार मानतात. हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर मंत्रालयाने ही कुलगुरूंची बैठक बोलावण्याचा निर्णय केला होता. मात्र, दरम्यानच्या काळात “जेएनयू‘मध्ये या महिन्याच्या पहिल्याच दिवशी अफजल गुरू प्रकरण घडले व आजच्या बैठकीतील चर्चेचा मुख्य रोखही बदलला.
