Aqua Lineवर मिळणार ‘मोबाइल नेटवर्क’! भुयारी मेट्रोच्या 16 स्थानकांत सेवा सुरू; उर्वरित स्थानकांतही काम प्रगतिपथावर

Share This:

मेट्रो-३च्या भुयारी मार्गावर प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना आता मोबाइलवर ‘हॅलो’ बोलून विनाअडथळा बाहेरच्या दुनियेशी संवाद साधता येणार आहे. व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेल यांनी आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक या मार्गावरील स्थानकांमध्ये मोबाइल नेटवर्क सेवा सुरू केली आहे. भुयारी २७ मेट्रो स्थानकांपैकी १६ स्थानकांत मोबाइल नेटवर्क सुरू झाले असून उर्वरित स्थानकांत टप्प्याटप्प्याने ही सेवा सुरू होणार आहे.

मेट्रो-३मध्ये तांत्रिक बिघाड

भुयारी मेट्रो सुरू झाल्यापासून नेटवर्कअभावी प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. बोगद्यात प्रवेश केल्यानंतर कॉल अचानक खंडित होणे, इंटरनेट सेवा बंद पडणे, ऑनलाइन बैठका आणि कार्यालयीन कामकाजात व्यत्यय येणे, तसेच यूपीआय व्यवहार अडकणे अशा तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. विशेषतः विमानतळावरून प्रवास करणारे आणि बीकेसीसारख्या व्यावसायिक केंद्रांमध्ये काम करणाऱ्या प्रवाशांसाठी ही मोठी समस्या ठरत होती. २२ मे रोजी मेट्रो-३मध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडाच्या वेळी नेटवर्क नसल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधता न आल्याने या सुविधेची गरज अधिक तीव्रतेने जाणवली होती.

या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल)ने भारती एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडिया या दूरसंचार कंपन्यांना भूमिगत स्थानके आणि बोगद्यांमध्ये ‘इन-बिल्डिंग सोल्यूशन्स’ प्रणाली उभारण्याची, तसेच तिचे संचालन आणि देखभाल करण्याची जबाबदारी दिली आहे. या तंत्रज्ञानामुळे स्थानके आणि बोगद्यांमध्ये अखंड व्हॉइस व डेटा कनेक्टिव्हिटी मिळत आहे. तर, जिओने आवश्यक सर्वेक्षण पूर्ण केले असून, लवकरच नेटवर्क उभारणीचे काम सुरू होणार आहे. जुलैपर्यंत संपूर्ण अॅक्वा लाइनवर जिओची सेवा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
प्रवाशांना आता भुयारी मेट्रोतही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी संपर्क साधणे शक्य होणार आहे.

या स्थानकांमध्ये नेटवर्क सेवा सुरू

आरे जेव्हीएलआर, सीप्झ, मरोळ एमआयडीसी-अंधेरी, नाका, सीएसएमआय विमानतळ टर्मिनल-२, सहार रोड, सीएसएमआय विमानतळ टर्मिनल-१, सांताक्रूझ, वांद्रे कॉलनी, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी), धारावी, शितलादेवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक, वरळी आणि आचार्य अत्रे चौक या १६ स्थानकांमध्ये व्होडाफोन आयडियाची सेवा सुरू झाली आहे. एअरटेलची सेवा सध्या आरे जेव्हीएलआर ते बीकेसी या १० स्थानकांवर सुरू झाली असून उर्वरित स्थानकांवरही ती टप्प्याटप्प्याने सुरू केली जाणार आहे.

पुढील टप्पा : कुलाबा ते सीप्झ

सायन्स सेंटर, महालक्ष्मी, जगन्नाथ शंकर शेठ, ग्रँट रोड, गिरगाव, काळबादेवी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), हुतात्मा चौक, चर्चगेट, विधान भवन आणि कफ परेड या उर्वरित ११ स्थानकांमध्येही पुढील काही आठवड्यांत मोबाइल नेटवर्क सुविधा सुरू होणार आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर कुलाबा ते सीप्झ या संपूर्ण ३३.५ किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गावर प्रवाशांना अखंड मोबाइल आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा लाभमिळणार असून मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे.