बंगळुरुत एका 34 वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. तरुणी भाड्याच्या घरात राहत होती. याच घरात संशयास्पद स्थितीत तिचा मृतदेह सापडला आहे. तरुणी मूळची झारखंडची असून, एकटीच राहत होती. घरात रक्ताच्या थारोळ्यात तिचा मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली. तरुणी एका खासगी कंपनीत कामाला होती असं वृत्त पीटीआयने दिलं आहे. शेजाऱ्यांनी घरातून दुर्गंध येत असल्याचं सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
पूजा दत्त असं पीडित तरुणीचं नाव आहे. पूजा झारखंडच्या धनाबाद जिल्ह्याची निवासी होती. पीटीआयच्या वृत्तानुसार, एका खासगी कंपनीत ती नोकरीला होती. घरातून दुर्गंध येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी प्रशासनाला फोन करुन तक्रार केली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता, त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी तरुणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. दरम्यान मृतदेह थोडासा कुजलेला होता.
फॉरेन्सिक तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचा दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा. पोलिसांनी सांगितलं आहे की, घटनास्थळी आम्हाला कोणतंही पत्र सापडलेलं नाही. पण घरात कागद पसरलेले होते. पोलिसांना तरुणीने आतून दरवाजा बंद करुन आत्महत्या केली असा पोलिसांना संशय असल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे.
घराच्या मालकीणीने पोलिसांना सांगितलं आहे की, तरुणी मागील तीन वर्षांपासून घरात भाड्याने राहत होती. 23 एप्रिलला भाजी, घरातील सामान आणण्यासाठी बाहेर पडली तेव्हा तिला शेवटचं पाहिलं होतं. पोलिसांनी संशयीतरित्य मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आपण सर्व बाजूंनी तपास करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पोलीस सध्या पुढील तपास करत आहेत.
पतीकडून पत्नीची हत्या
सूरतमध्ये पतीने आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याचं प्रकरण सध्या चर्चेत आहे. पतीने चिठ्ठीच्या माध्यमातून पोलिसांकडे आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. चिठ्ठीच्या आधारे पोलीस एका ओसाड आणि पडक्या घरात पोहोचले होते. येथे पोलिसांना एक लाकडी पेटी आढळली. पोलिसांनी पेटी उघडली, तेव्हा त्यांना त्यामध्ये फोम आणि सिमेंटच्या मिश्रणात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी शहराच्या बाहेरील एका ग्रामीण भागातून पती विशालचा शोध घेतला आणि अटक केली.
प्राथमिक तपासात, 4 ते 5 दिवसांपूर्वी महिलेचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं. कुजणाऱ्या मांसाचा दुर्गंध लपवण्यासाठी तिला सिमेंट व फोमच्या मिश्रणात पुरण्यात आलं होतं. पोलिसांनी याप्रकरणी विशालविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. शिल्पाच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील तपास सुरु आहे.
