मे महिन्यात मुंबई विमानतळ बंद; तारीखसुद्धा ठरली

Share This:

भारतातील अतिशय महत्त्वाच्या विमानतळांपैकी एक असणाऱ्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासंदर्भातील महत्त्वाचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. चर्चा सुरू आहे ते म्हणजे हे विमानतळ बंद केलं जाण्याची. एकिकडे नवी मुंबई विमानतळाकडे अनेक उड्डाणांचा वाढवला जाणारा ओघ पाहता मुंबई विमानतळासंदर्भातील (CSMIA) हे वृत्त सर्वांचं लक्ष वेधत आहे. मात्र, इथं लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे हे विमानतळ दीर्घकाळासाठी नव्हे, तर काही तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी विमानतळावरहा मेगाब्लॉक असेल.

मान्सूनपूर्व देखभालीची कामं हाती घेत ती कामं पूर्णत्वास नेण्यासाठी 7 मे 2026 रोजी मुंबई विमानतळ सकाळी 11 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या सहा तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यादरम्यान विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या बंद राहतील आणि दरम्यानच्या काळात विमानांची उड्डाणं आणि लँडिंग पूर्णपणे थांबवण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. धावपट्ट्यांसमवेत विमानतळावरील अन्य पायाभूत सुविधांची देखभाल या वेळेत केली जाणार आहे. या देखभालीसंदर्भात सर्व विमान कंपन्यांना विमानतळ प्रशासनाकडून सहा महिने आधीपासूनच पूर्वकल्पना दिली देत या सहा तासांत मुंबई विमानतळावरून कोणत्याही विमानांची वाहतूक होणार नाही हे स्पष्ट करण्यात आलं होतं. या मोहिमेला ‘मान्सून रेडिनेस’ असं नाव देण्यात येत आहे.

दरवर्षी राबवण्यात येते ही मोहिम… 

पावसाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी मुंबई विमानतळावर ही मोहिम राबवण्यात येते. ज्यामध्ये विमानतळावरील वाहतूक काही तासाांसाठी पूर्णत: बंद ठेवलण्यात येते. त्यामुळं 7 मे रोजी कोणत्याही प्रवासाचं नियोजन असल्यास विमानाच्या बदललेल्या वेळा आणि ठिकाण यांबाबतची माहिती पुन्हा एकदा तपासून पाहा. प्रवास निश्चित केला नसल्यास त्याच्या तारखांमध्ये आवश्यक ते बदल करा.

सहा तासांमध्ये विमानतळावर कोणती कामं केली जाणार? 

7 मे रोजी मुंबई विमानतळावर दोन्ही धावपट्ट्या बंद असताना तिथं अनेक कामं एकाच वेळी पार पडतील. यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम असेल धावपट्टीच्या सुरक्षिततेचं. विमानांचं लँडिंग आणि टेक ऑफ सुरक्षित व्हावं याची काळजी घेताना धावपट्टीवरील झीज भरून काढण्यासाठी काही तांत्रिक दुरुस्तीची कामं विमानतळ प्रशासन हाती घेईल. जामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं ही कामं निर्धारित 6 तासांच्या वेळेत पूर्ण करण्यावर भर गिला जाईल.