कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे याने डॉक्टरांना मारहाण केली होती. सृष्टी बाविस्कर या महिला डॉक्टरला देखील म्हात्रेने शिवीगाळ करत मारहाण केली होती. मारहाण झालेल्या डॉक्टर तरुणीवर या घटनेचा मानसिक आघात झाला आहे. अजूनही ती झोपेतून दचकून जागी होते तसंच, ओरडतेदेखील, असं डॉक्टर सृष्टी बाविस्कर हिच्या वडिलांनी सांगितलं आहे.
घटनेला तीन दिवस उलटून गेल्यानंतरही डॉ.सृष्टी अजून कामावर रुजू झालेली नाही, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र सृष्टीने राजीनामा दिलेला नाही. तिच्यावर मानसिक आघात झालाय. अजूनही ती झोपेत आम्हाला मारतात अशी ओरडते अशी प्रतिक्रिया डॉ.सृष्टीच्या वडिलांनी दिली आहे. त्याचबरोबर निवडून आलेले हे नगरसेवक जनतेची काम करण्याऐवजी डॉक्टरांना मारहाण करतात ही खेदाची गोष्ट आहे तर दुसरीकडे या रुग्णालयात सुरक्षारक्षक असताना देखील त्यांनी बघायची भूमिका घेतली या याबाबत डॉ.सृष्टीच्या वडिलांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.
रमेश म्हात्रेला अटक होऊ नये यासाठी महापालिका आयुक्त, पोलिसांवर दबाव होता ते सत्ताधारी पक्षाचे असल्याने त्यांना अटक व्हावी असे त्यांना वाटत नव्हतं असा आरोप सृष्टीच्या वडिलांनी केलाय.
रमेश म्हात्रेला आज कोर्टात हजर करणार
कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणात मुजोर नगरसेवक रमेश म्हात्रेला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. व्हिसीद्वारे सुनावणीस कोर्टाने नकार दिल्यानंतर म्हात्रेला आज प्रत्यक्ष कोर्टासमोर हजर केलं जाईल. दरम्यान काल त्याला कोर्टात हजर करण्यात येणार होतं, व्हीसीद्वारे उपस्थित राहण्याच्या परवानगीसाठी त्यानं कोर्टात अर्ज केला होता, मात्र कोर्टानं त्याचा अर्ज फेटाळत त्याला प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्याला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
तर दुसरीकडे मुजोर नगरसेवक रमेश म्हात्रेच्या मारहाणीच्या कृत्याविरोधात सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे. तसेच अशा मुजोर नगरसेवकाची पक्षातून हकालपट्टी कधी करणार? असा सवालही उपस्थित होतोय. जो लोकप्रतिनिधी जनतेच्या सेवेसाठी असतो आणि तोच जनतेवर हात उचलत असेल ही दुर्दैवी बाब आहे.
