सत्ताधारी भाजपच्या ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ अशा घोषणा केंद्रस्थानी राहिलेला विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा आज, सोमवारी संध्याकाळी ५ वाजता थंडावणार आहेत. बुधवारी राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार असून शनिवारी मतमोजणी होईल. तत्पूर्वी प्रचार थांबल्यानंतर विविध पक्षांकडून होणाऱ्या छुप्या प्रचारावर निवडणूक आयोगाचे लक्ष असेल.
आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या प्रचाराची पातळी यंदा फारच खालावल्याचे निरीक्षण अनेकांनी नोंदविले. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि प्रचाराची रंगत वाढत गेली. ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विदर्भात वातावरण तापविले. त्यापाठोपाठ राज्यातील प्रचाराची सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’ असा नारा दिला. मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या या दोन घोषणांभोवती प्रचाराची दिशा फिरू लागली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या दोन घोषणांवरून भाजपवर हल्ला चढविला. भाजपला देशाचे तुकडे करायचे आहेत, अशी टीका विरोधकांनी केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या ‘बटेंगे’ आणि ‘सेफ’ या दोन घोषणांचा प्रचार सभांमध्ये समाचार घेतला. विशेष म्हणजे महायुतीचे घटक असले तरी राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ या भाजपच्या घोषणेशी सहमत नाही, अशी भूमिका मांडली. ‘बटेंगे आणि सेफ है’ या दोन घोषणांमुळे मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न होता. दुसरीकडे, या घोषणांच्या आधारे विरोधी मतांचे ध्रुवीकरण करण्यावर महाविकास आघाडीने भर दिला होता.
महायुतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धुळे, नाशिक, अकोला, नांदेड, चिमूर, सोलापूर, पुणे, संभाजीनगर, रायगड, मुंबई अशा दहा सभा झाल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपचा किल्ला लढविला. याशिवाय योगी आदित्यनाथ, राजनाथ सिंग यांच्यासह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री प्रचारात सहभागी झाले होते. काँग्रेसमध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लीकार्जुन खरगे आदी नेते प्रचारासाठी मैदानात उतरले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपापल्या पक्षांच्या प्रचारासाठी दररोज किमान चार तरी सभा घेतल्या. प्रचारात नेहमीच आरोप-प्रत्यारोपांचा राळ उठते. पण यंदा प्रचाराची पातळी खालावली. शेवटच्या टप्प्यात नेतेमंडळींच्या हेलिकॉप्टर आणि गाड्यांची तपासणी वादात सापडली.
दशसूत्री विरुद्ध पंचसूत्री
महायुतीने गॅरंटीची ‘दशसूत्री’ दिली तर त्याला महाविकास आघाडीकडून ‘पंचसूत्री’ सादर करून प्रत्युत्तर देण्यात आले. लाडकी बहीण योजनेवर महायुती व महाविकास आघाडीने जाहीरनाम्यांमध्ये भर दिला. महायुती आणि महाविकास आघाडीचे संयुक्त जाहीरनामे जाहीर करण्यात आले. मात्र शिवसेने (शिंदे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षांनी आपले स्वतंत्र जाहीरनामे प्रसिद्ध केले नाहीत.