लालबाग येथे मुलीला मारून पित्याची आत्महत्या

 लालबाग येथे ४२ वर्षीय पित्याने मुलीची हत्या करून आत्महत्या केल्याचा गंभीर प्रकार घडला. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. भूपेश आत्माराम पवार(४२) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते गणेश गल्ली येथील विमावाला इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कुटुंबासोबत राहत होते. मंगळवारी त्यांनी पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर मुलगी आर्या पवार (११) हिला गळफास लावून तिची हत्या केली. त्यानंतर स्वतःला गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली.

राहत्या घरात हा प्रकार घडल्यानंतर त्यांना तात्काळ परळ येथील केईएम रुग्णालयात नेण्यात आले. पण तेथील डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. याप्रकरणी सुरूवातीला दोन अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती. घटनेमुळे कुटुंबिय बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. मंगळवारी रात्री याप्रकरणी भाग्यश्री पवार यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्याच्या तक्रारीवरून काळाचौकी पोलिसांनी पवार यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *