भारतरत्न ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना सोमवारी पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना लतादीदींच्या आठवणी विशद करताना आशाताई भावूक झाल्या, तर हाजी अली येथे लता मंगेशकर यांचे ४० फुटांचे स्मारक उभारणार असल्याची घोषणा भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी केली.मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८१ व्या पुण्यतिथिनिमित्त मंगेशकर प्रतिष्ठानद्वारे प्रदान करण्यात आलेल्या सर्व पुरस्कारांचे स्वरुप सन्मानचिन्ह आणि एक लाख एक हजार एक रोख रुपये असे होते.
कला, संगीत, समाजसेवा, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान केला जातो. यावर्षी भारतीय संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल पंकज उधास यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट नाटक व उत्कृष्ट नाटय़निर्मितीचा पुरस्कार ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या गौरी थिएटर्स या संस्थेला, समाजसेवेच्या क्षेत्रात समर्पित सेवेसाठी श्री सदगुरु सेवा ट्रस्ट, साहित्य क्षेत्रासाठी ग्रंथाली प्रकाशनाला वागविलासिनी पुरस्कार, नाटक आणि चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रसाद ओक आणि चित्रपट क्षेत्रासाठी विद्या बालन या सर्व मान्यवरांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
