अंबरनाथ नगरपालिकेतील एक लाचखोर लिपिक वर्षभरात दुसऱ्यांदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात लाच घेताना सापडला आहे. दीपक बोरसे असे त्याचे आहे. नवीन बांधकाम केलेल्या चार घरांना नगरपालिका कर आकारणी करण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. बांधकाम विभागाचा कामगार महेश गागडे याने ही लाच स्वीकारली. गागडे याला रंगेहाथ पकडल्यानंतर लिपिक बोरसे यांनाही पालिकेच्या प्रवेशद्वारावर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.
अंबरनाथ शहरात अनेक नवीन इमारती उभ्या राहत आहेत. नव्या मालमत्तांच्या पावत्यांवर रहिवाशाचे नाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया स्वतः मालमत्ताधारक करत असतात. अनेकदा या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ आणि तांत्रिक अडचणी येतात. त्यामुळे चटकन काम पूर्ण करण्याची इच्छा असलेल्या मालमत्ताधारकांचा फायदा पालिकेतील कर विभागातील काही कर्मचारी घेत असतात.
तक्रारदाराने आपली चार नवीन घरे करपात्र करण्यासाठी पालिकेत अर्ज केला होता. त्यासाठी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. त्यातील दोन हजार रुपये १३ एप्रिल रोजी स्वीकारण्यात आले. तर उर्वरित १३ हजार रुपयांची रक्कम १७ एप्रिल रोजी देण्यात येणार होती. त्यानुसार सोमवारी संध्याकाळी अंबरनाथ नगरपालिकेच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता. त्यानुसार तक्रारदाराकडून १३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना महेश गागडे यांना अंबरनाथ पश्चिमेतील लादी नाका येथील गायत्री मेडिकल येथे रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर लिपिक दीपक बोरसे यांना अंबरनाथ नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारातून ताब्यात घेण्यात आले.
