धोकादायक जाहिरात फलकांमुळे जीव टांगणीला

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील अनेक भागांत उभ्या असलेल्या धोकादायक जाहिरातफलकांमुळे जीव टांगणीला लागला आहे. पिंपरी-चिंचवडमधील किवळे परिसरात सोमवारी (१७ एप्रिल) सायंकाळी पाऊस सुरू झाला. सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे नागरिक जाहिरात फलकाच्या आडोशाला थांबले. त्या वेळी जाहिरात फलकाचा सांगाडा नागरिकांच्या अंगावर कोसळला. या घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तसेच दहा ते बारा जण जखमी झाल्याची घटना घडली.

धोकादायक जाहिरात फलकामुळे नागरिकांचे बळी गेल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यात आली. अशाच प्रकारची घटना पुण्यातील मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकात ५ ऑक्टोबर २०१८ रोजी घडली होती. अमर शेख चौकातील रेल्वे प्रशासनाच्या जागेत लावलेला जाहिरातफलक अचानक कोसळला. या घटनेत चौघांचा जागीच मृत्यू झाला होता.

शाहीर अमर शेख चौकातील दुर्घटनेत श्यामराव गंगाधर कासार (वय ७०, रा. पिंपळे गुरव, पुणे), श्याम राजाराम धोत्रे (वय ४५, रा. देहूरोड), जावेद मिसबाउद्दीन खान (वय ४९), शिवाजी देवदास परदेशी (वय ४०, रा. नाना पेठ, पुणे) यांचा मृत्यू झाला होता. अपघातात मृत्युमुखी पडलेले शिवाजी परदेशी रिक्षाचालक होते. दुर्घटनेच्या आदल्या दिवशी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. पत्नीच्या अस्थींचे विसर्जन करून घरी परतत असताना जाहिरातफलक कोसळून परदेशी यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जाहिरातफलक लावणारी संस्था, रेल्वेतील अधिकारी, अभियंता यांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

धोकादायक जाहिरात फलक खिळखिळे

पिंपरीतील किवळे परिसरात जाहिरात फलक कोसळून पाच जणांचे बळी गेल्याच्या घटनेनंतर धोकादायक जाहिरात फलकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख चौकातील इमारतींवर जाहिरात फलकांचे लोखंडी सांगडे आहेत. ऊन, वारा, पावसामुळे जाहिरात फलकांचे लोखंडी सांगाडे खिळखिळे झाल्याने गंभीर स्वरूपाची दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

महापालिकेची जबाबदारी परवानगीपुरती

शहरातील महत्त्वाच्या चौकांत लावण्यात येणाऱ्या जाहिरातफलकांना महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून परवानगी देण्यात येते. जाहिरातफलकांच्या लोखंडी सांगड्यांची देखभाल आणि दुरुस्तीवर देखरेख करणारी यंत्रणा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *