आपल्या घरातील एखादा सदस्य हरवला अथवा घर सोडून गेला, तर कुटुंबीय कासावीस होतात. त्याची तक्रार पोलीस स्थानकात देत वर्तमानपत्रात जाहिरात देतात. त्यातही समाधान झालं नाही तर, शोधून देणाऱ्या व्यक्तीला बक्षीस जाहीर केले जाते. पण, हे सगळं एखाद्या पाळीव प्राण्यासाठी होत असेल तर?, अशीच काही घटना सोलापूर शहरात घडली आहे. त्याची सोशल मीडियावर जोमात चर्चा सुरू आहे.
सोलापुरातील बासूतकर कुटुंबीयांच्या घरातील एक मांजर (मन्या) तीन दिवसांपासून गायब होते. भिंतीवर पोस्टर चिकटवण्यापासून सोशल मीडियावर आवाहन केल्याच्या तीन दिवसानंतर मांजराचा शोध लागला. बासूतकर कुटुंबीयांच्या घरातील मांजर म्हणजेच मन्यावर कुत्र्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात मांजराच्या पोटावर जखम झाली होती. त्यामुळे त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आलं. कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात त्या मांजराला मोठी जखम झाली होती. जखमेला टाके घेण्याशिवाय पर्याय नव्हता.
