लग्नाला अवघे तीन महिने होत नाही तर आरती योगेश गाडेकर या १८ वर्षीय विवाहितेने बुधवारी सकाळी आत्महत्या केल्याचे समोर आले होते. लग्नाला काही महिनेच झाले असताना आरतीने आत्महत्या केल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. आता अखेर दोन दिवसांनंतर आरतीच्या आत्महत्येचं कारण समोर आलं आहे.
आरतीच्या माहेरच्यांनी लग्नात हुंडा दिला नाही म्हणून सासरकडील मंडळी त्रास देत होते. तसंच, कपड्याचे दुकान टाकण्यासाठी दोन लाख रुपयाचा तगादा सासरच्या मंडळीकडून सुरु होता. याचं छळाला कंटाळून आरतीने आत्महत्या केली. या प्रकरणी पती योगेश गाडेकर, सासू लक्ष्मीबाई गाडेकर, सासरे कारभारी गाडेकर, व नणंद ज्योती लाळ या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन महिन्यापूर्वी आरतीचे योगेश सोबत मोठ्या थाटामाटात लग्न पार पडले होते. सुरुवातीला सासरच्या मंडळींनी चांगले नांदवले मात्र काही दिवसानंतर या ना त्या कारणाने आरतीला त्रास देण्यास सुरुवात केली. मात्र दरम्यानच्या काळात लग्नात हुंडा दिला नाही म्हणून त्रास दिला जात होता. व कपड्याचे दुकान टाकण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये, असा तगादा सुरु होता. या बाबत आरतीने माहेरी कल्पना दिली होती.मात्र नवीन लग्न झाले आहे सर्व काही सुरळीत होईल असे सांगत आरतीला धीर दिला.
मंगळवारी आरतीच्या माहेरी पितृपक्षाचा कार्यक्रम असल्याने जावई योगेश आला होता. रात्री तेथून योगेश आणि आरती दोघेही घरी गेले. नेहमीच्या छळाला कंटाळून आरतीने ओढणीच्या सहय्याने गळफास घेतला. या प्रकरणी आरतीच्या वडिलांच्या फिर्यादिवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
