हरियाणात्या गुरुग्राममध्ये एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अनेकांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. एका स्पामध्ये हे सर्व घडल्याचा आरोप आहे, जिथे ही अल्पवयीन रिसेप्शनिस्टची नोकरी करत होती. येथील संचालकांनी मुलीवर लैंगिंक संबंध प्रस्थापित करण्यासाठी दबाव टाकल्याचाही आरोप आहे. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये स्पा चालवणाऱ्या महिलेचाही समावेश आहे.
नोकरीच्या पहिल्या दिवशी, मुलीला कथितपणे एका खोलीत बोलावले गेले आणि एका पुरुषासोबत त्या खोलीत राहण्यात भाग पाडले. त्याच खोलीत तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप तिने केला आहे. जेव्हा तिने नोकरी सोडणार असल्याचे सांगितले, तेव्हा तिला लैंगिक अत्याचाराचा व्हिडिओ दाखवून धमकीही देण्यात आली, असाही आरोप आहे.
त्यांनी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. मी खूप घाबरले आणि पुढील ४-५ दिवस स्पामध्ये गेले. त्यावेळी अनेकांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केले. दररोज माझ्यावर जवळपास १०-१५ पुरुषांनी बलात्कार केला,” असं अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितले.
अखेर काही दिवसांनी मुलीने हिंमत दाखवली आणि स्पामध्ये जाणं बंद केलं. मात्र, ती महिला आणि तिचे साथीदार तिला सतत फोन करायचे, ते तिला हॉटेलमध्ये घेऊन गेले आणि तिथे तिला मारहाण करण्यात आली.
त्यानंतर मुलीच्या पालकांनाच काहीतरी गडबड असल्याचा संशय आला आणि ते पोलिसात गेले. त्यानंतर अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितले की, सदर महिला आणि इतर जण अल्पवयीन मुलींना अडकवण्यासाठी आणि त्यांना वेश्याव्यवसायात भाग पाडण्याचं काम करतात. त्यानंतर या चौघांवर आयपीसीच्या कलम ३२३, ३४, ३७६डी (सामूहिक बलात्कार), ५०६ (गुन्हेगारी धमकी) आणि पोक्सो कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे.
