मध्य भारतातील एकमात्र शासकीय केंद्रात पिवळ्या तापाच्या केवळ १० लस मात्रा उपलब्ध!

अफ्रिकन देशात जाणाऱ्या भारतीयांना पिवळ्या तापाची प्रतिबंधात्मक लस घेणे बंधनकारक आहे. मध्य भारतात डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय हे एकच शासकीय लस केंद्र आहे. येथे ३०० रुपयांत लस मिळते. तर काही खासगी केंद्रात ६ ते ७ हजार रुपये आकारले जातात. तूर्तास डागात केवळ १० लसमात्रा उपलब्ध आहे. त्यामुळे अफ्रिकेत जाण्यास इच्छुकांना माफक दरात या लस मिळणार कशा? हा प्रश्न अनुत्तरित आहे.अफ्रिकन देशात मोठ्या प्रमाणावर पिवळा ताप आढळतो. या रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांनाही पिवळ्या तापाची लागण होण्याची शक्यता असते. तेव्हा आफ्रिकन देशात जाणाऱ्यांना या आजारापासून वाचण्याकरिता पिवळ्या तापाची प्रतिबंधात्मक लस बंधनकारक आहे. या लसीमुळे संबंधित पर्यटक आफ्रिकन देशातून त्यांच्या देशात परतल्यावर हा आजार इतरांमध्ये पसरत नाही.

दरम्यान, ही लस घेतल्याचे अधिकृत प्रमाणपत्र प्रवाशाने जोडल्याशिवाय या प्रवाशाला त्या देशात जाण्याचा व्हिजाही मिळत नाही. नागपुरात डागा हे एकमात्र शासकीय लसीकरण केंद्र असून काही खासगी केंद्रही आहेत. शासकीय केंद्रात केवळ ३०० रुपयांत लस दिली जाते. परंतु खासगीत तब्बल ६ ते ७ हजार रुपये लसीसाठी आकारले जातात. शासकीय केंद्रात माफक दरात लस मिळत असल्याने येथे मुबलक लस मात्रेचा साठा असायला हवा. परंतु, तूर्तास येथे केवळ १० लसमात्रा शिल्लक असून त्यापैकी ७ लोकांनी लसीसाठी नोंदणी केली आहे.

 त्यामुळे आणखी तीन उमेदवार सोडले तर इतरांना या लस माफक दरात मिळणार कशा? हा प्रश्न अनुत्तरित आहे. डागातील एका अधिकाऱ्याने या लसी भारत सरकारकडून मिळत असून हिमाचलवरून येत असल्याचे सांगितले. करोना काळात लस घेणारे कमी असल्याने साठा कमी होता. परंतु, अचानक मागणी वाढल्याने लसींची मागणी नोंदवली आहे. ती पुढच्या महिन्यातच येणार असल्याचे सांगितले. तर डागाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा पारवेकर यांना भ्रमणध्वनी केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *