ब्रिटनच्या दिवंगत महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पार्थिव मंगळवारी स्कॉटलंडमधील एडिनबरा येथून लंडनला नेण्यात येणार आहे. दरम्यान, महाराणींना श्रद्धांजली वाहण्यासाठी हजारो नागरिकांची गर्दी जमली होती.
सोमवारी, राणीची चारही मुले – राजे चार्ल्स तिसरे, प्रिन्सेस अॅन, प्रिन्स अँडर्य़ू आणि प्रिन्स एडवर्ड यांच्या उपस्थितीत महाराणींचे पार्थिव एडिनबरामधील सेंट गिल्स चर्चमध्ये नेण्यात आले.
सोमवारी एडिनबराच्या रस्त्यावरून निघालेल्या अंत्ययात्रेत राजघराण्यातील ही सर्व शोकाकुल भावंडे सहभागी झाली होती. या वेळी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी चर्चबाहेर मोठय़ा संख्येने नागरिक जमले होते.
लंडनमध्ये राणीचे पार्थिव आणले जाणार आहे. तेथे नागरिकांना बुधवारपासून श्रद्धांजली वाहता येईल. मात्र, सोमवारपासूनच वेस्टमिन्स्टर अॅबेच्या बाहेर नागरिकांनी रांगा लावल्या. श्रीलंकन वंशाच्या ५६ वर्षीय व्हेनेसा नाथकुमारन या रांगेतील पहिली व्यक्ती होती. त्यांचे कुटुंब राजघराण्याचे चाहते आहे. महाराणींचे पार्थिव मंगळवारी संध्याकाळी ‘रॉयल एअरफोर्स’च्या (आरएएफ) विमानाने एडिनबराहून लंडनला नेण्यात येईल. परंपरेनुसार, किंग चार्ल्स तिसरे आणि त्यांची पत्नी राणी कन्सोर्ट कॅमिला उत्तर आर्यलडच्या शोक दौऱ्यावरून परतल्यानंतर लंडनमध्ये महाराणींच्या पार्थिवास अभिवादन करतील. त्यानंतर पार्थिव रात्रभर बकिंगहॅम पॅलेसच्या ‘बो रूम’मध्ये ठेवण्यात येईल, जिथे शाही कुटुंबातील सदस्य तिला श्रद्धांजली वाहतील.
बुधवारी अंत्ययात्रा निघेल. महाराणींचे पार्थिव बकिंगहॅम पॅलेस ते वेस्टमिन्स्टर अॅबे (पार्लमेंट संकुल) येथे नेले जाईल. ही अंत्ययात्रा ब्रिटनच्या राजधानीतील प्रतिष्ठित क्वीन्स गार्डन, द मॉल, हॉर्स गार्डस आणि हॉर्स गार्डस आर्क, व्हाईट हॉल, पार्लमेंट स्ट्रीट, पार्लमेंट स्क्वेअर आणि न्यू पॅलेस यार्डमधून जाईल. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर १९ सप्टेंबर रोजी वेस्टमिन्स्टर अॅबे येथे पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.
मध्य लंडनमध्ये वेस्टमिन्स्टर ते टॉवर ब्रिजपर्यंत अंदाजे पाच किलोमीटरची रांग लागण्याचा अंदाज आहे.
२००२ मध्ये एलिझाबेथ द्वितीय यांच्या मातुश्रींच्या अंत्यसंस्कारात दोन लाख नागरिक सहभागी झाले होते. आता महाराणी एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्कारात त्यापेक्षा दुप्पट नागरिक सहभागी होऊन आपल्या महाराणीस अभिवादन करण्याची शक्यता आहे.
अंत्यसंस्कारास पाचशे परदेशी मान्यवर
ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सांगितले,की महाराणींच्या अंत्यसंस्कारासाठी ५०० परदेशी मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शासकीय अंत्यसंस्कारात ते सहभागी होणार आहेत. परंतु रशिया, बेलारूस किंवा म्यानमारच्या नेत्यांना आमंत्रणे पाठवण्यात आलेली नाहीत. अधिकाऱ्यांनी सांगितले,की लंडनच्या वेस्टमिन्स्टर अॅबे येथे सोमवारी होणारा अंत्यविधी हा ब्रिटनमधील अनेक दशकांतील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय समारंभ असेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन, पत्नी जिल बिडेन यांच्यासह सहभागी होतील. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडासह बहुतेक राष्ट्रकुल देशांचे नेतेही सहभागी होण्याची शक्यता आहे. जपानचे सम्राट नारुहितो आणि स्पेनचे राजे फिलिप सहावे आणि राणी लेटिझिया तसेच माजी स्पॅनिश राजे जुआन कार्लोस पहिले आणि राणी सोफिया याही उपस्थित राहणार आहेत.
