दगडांनी भरलेले पिंप रेल्वे रुळांवर ठेवले; मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला

मशीद स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर दगडांनी भरलेले पिंप ठेवण्यात आले होते. मात्र, मोटरमन अशोक शर्मा यांच्या प्रसंगावधानामुळे गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-खोपोली जलद लोकलचा मोठा अपघात टळला. याप्रकरणी भायखळा येथील रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, मशीद आणि वाडी बंदर येथील सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास सुरू असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जलद लोकलच्या रेल्वेरुळांवर गुरुवारी दुपारी मशीद स्थानकाजवळ दगडाने भरलेला पिंप पाहताच मोटरमन अशोक शर्मा यांनी आपत्कालीन ब्रेक लावले. मात्र, गाडी वेगात असल्याने लोकल त्या पिंपाला धडकली आणि ते पिंप लोकलखाली आले. पिंपाला धडक बसून मोठा आवाज झाल्याने प्रवासी देखील घाबरले.

दरम्यान, मोटरमन यांनी अशोक यांनी प्रवाशांच्या मदतीने पिंप बाहेर काढले. मोटरमन शर्मा यांनी वेळीच ब्रेक लावल्याने लोकलचा मोठा अपघात टळला. या अपघातामुळे लोकल विलंबाने धावत होती.

याप्रकरणी भायखळा येथील रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्यात कलम १५४ अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडाने भरलेले पिंप रुळांवर कोणी ठेवले, याप्रकरणी मशीद आणि वाडी बंदर येथील सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास सुरू असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *