रामगढताल पोलीस हद्दीत आणखी एका तरुणाचा मारहाणीनंतर मृत्यू

उत्तर प्रदेशातील कानपूरचे व्यावसायिक मनीष गुप्ता यांच्या हत्या प्रकरणामुळे गोरखपूर जिल्ह्यातील रामगढताल पोलीस स्टेशन चर्चेत आहे. दरम्यान, याच पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या भागात आणखीन एका व्यक्तीची काही नशेत असणाऱ्या काही तरुणांकडून मारहाणीनंतर मृत्यू झालाय. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडालीय. नागरिकांमध्ये धास्तीचं वातावरण आहे.

मनीष गुप्ता हत्या प्रकरण अद्यापही निवळलेलं नाही. गुप्ता यांच्या मृत्यूनंतर केवळ ७२ तासांच्या आत याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत आणखीन एका तरुणाचा मारहाणीनंतर मृत्यू झाल्याचं समोर येतंय. रामगढताल पोलीस स्टेशनपासून केवळ २०० मीटर अंतरावर एका दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा काही तरुणांकडून मारहाण करण्यात आल्यानंतर मृत्यू झाला आहे. तर या घटनेत गंभीर जखमी झालेल्या एकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

या घटनेतील मृताचं नाव मनीष प्रजापती असल्याचं समजतंय. २५ वर्षीय मनीष ‘वरदानी मॉडल शॉप’मध्ये कॅन्टीनवर कर्मचारी म्हणून काम करत होता. गुरुवारी रात्री जवळपास ८.०० वाजल्याच्या सुमारास इथं काही तरुण दारू पिण्यासाठी दाखल झाले होते. त्यांनी मनीषला ऑर्डर दिली. मात्र, ऑर्डर मिळण्यासाठी उशीर झाल्याचं सांगत ग्राहकांनी मनीषला फैलावर घेतलं. त्यांच्यात वाद सुरू असताना रघू नावाचा आणखी एक कर्मचारी हा वाद थांबवण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, जवळपास सहा तरुणांनी दोन्ही कर्मचारी तरुणांना मारहाण सुरू केली.
पोलीस निरीक्षक के के राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत. दुकानात लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपींचा शोध सुरू आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *