महापालिकेच्या उद्यानांचे प्रवेशशुल्क वाढणार?

महापालिकेच्या काही उद्यानांमध्ये जायचे असेल, तर तुम्हाला आता अधिक शुल्क मोजावे लागेल. सध्या बहुतांश उद्यानांमध्ये पन्नास पैसे; अथवा एक किंवा दोन रुपये प्रवेशशुल्क आकारले जाते. त्यांचे शुल्क आता दहा रुपये होण्याची शक्यता आहे. मासिक पासचा दर २० रुपयांवरून थेट २०० रुपये केला जाणार आहे. याबाबतच्या प्रलंबित प्रस्तावावर आज (गुरुवारी) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय अपेक्षित आहे.  महापालिकेच्या उद्यान विभागाने या संदर्भात सादर केलेला प्रस्ताव २७ जुलै रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत दोन महिने पुढे ढकलण्यात आला होता. त्यानुसार प्रशासनाने पुन्हा हा प्रस्ताव स्थायीपुढे आणला आहे.

शहीद मेजर ताथवडे उद्यान, राजा मंत्री उद्यान, जयंतराव टिळक उद्यान, संत गजानन महाराज उद्यान, धोंडिबा सुतार बालोद्यान, विठाबाई पुजारी उद्यान, गलांडे पाटील उद्यान, कल्याणीनगर जॉगर्स पार्क, फिरोदिया उद्यान, पु. ल. देशपांडे उद्यान, मॉडेल कॉलनी तळे उद्यान आणि लिम्का जॉगिंग पार्क या उद्यानांचे प्रवेशशुल्क वाढविण्याचा हा प्रस्ताव आहे. उद्यानांमध्ये प्रवेशासाठी प्रौढांना दहा रुपये, लहान मुलांना पाच रुपये आकारण्यात येतील. मासिक पाससाठी दोनशे रुपये शुल्क आकारण्यात येईल. याचबरोबर परदेशी नागरिकांसाठी दररोज शंभर रुपये शुल्क असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *