‘कोविड – 19’ या प्रादुर्भावाला आळा घालण्याच्या विविध स्तरीय उपाययोजनांचा एक प्रमुख भाग आहे तो म्हणजे कोविड विषयक वैद्यकीय चाचण्या. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनानुसार कोविड विषयक वैद्यकीय चाचण्या करण्याची कार्यवाही आणि व्यवस्थापन सातत्याने अधिकारी प्रभावीपणे करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मार्च 2020 पासून करण्यात येत असलेल्या या वैद्यकीय चाचण्यांनी नुकताच एक कोटींचा टप्पा पार केला आहे.
यानुसार 21 सप्टेंबर 2021 पर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण 1 कोटी 59 हजार 254 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त श्री. सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
कोरोनाचा पहिला रुग्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मार्च 2020 मध्ये आढळून आला होता. तेव्हापासून आतापर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे विविधस्तरीय प्रतिबंधात्मक उपाययोजना सातत्याने राबविण्यात येत आहेत. याच उपाययोजनांमध्ये कोविड विषयक वैद्यकीय चाचण्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
मुंबई महापालिकेतर्फे जनजागृती
कोविड या संसर्गजन्य रोगाची बाधा झाल्याचं निदान जेवढ्या लवकर होईल, तेवढ्याच लवकर संबंधित व्यक्तीचं विलगीकरण करता येतं. ज्यामुळे बाधित व्यक्तीपासून इतरांना बाधा होण्यास प्रतिबंध होतो. हीच बाब प्रामुख्याने लक्षात घेऊन कोविड विषयक चाचणी करून घेण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने जनजागृती करीत आहे आणि नियमितपणे चाचण्या देखील करीत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये, दवाखान्यांमध्ये आणि निर्धारित केंद्रांमध्ये या चाचण्या मोफत करण्यात येत आहेत.
