करोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच, आता शहरात डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे पालिकेच्या यंत्रणेसमोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. सप्टेंबरच्या वीस दिवसांत ४६ रुग्ण डेंगी पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. डेंगीचा वाढता फैलाव कसा रोखायचा, असा प्रश्न यंत्रणेसमोर निर्माण झाला आहे.
शहरात मार्च २०२०पासून करोना संसर्गाचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. या काळात डेंगीच्या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण नगण्य होते. त्यातुलनेत सारी या आजाराचे रुग्ण आढळून येत होते. या दोन्हीही आजारांची लक्षणे सारखीच असल्यामुळे उपाययोजना कशी करायची, असा प्रश्न आरोग्य यंत्रणेसमोर निर्माण झाला होता. आता सारीच्या आजाराचे प्रमाण जवळपास संपुष्टात आले आहे. सारी आजाराची जागा डेंगीच्या आजाराने घेतल्याचे चित्र आहे. एक वर्षाच्या खंडानंतर डेंगीच्या आजाराचे रुग्ण सापडतात असे पालिकेच्या आरोग्य विभागाचे निरीक्षण आहे.

