जिल्ह्यातील पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागात एक तीन मजली इमारत कोसळली. ही घटना सोमवारी रात्री दहा वाजता घडली. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. बांधकाम करताना काही तांत्रिक दोष राहिल्याने ही इमारत कोसळली. विशेष म्हणजे वर्षांपूर्वीच इमारतीचे बांधकाम झाले होते.
पाचोरा शहरातील व्हीपी रस्त्यावर साजेदाबी शेख खलील यांच्या मालकीची हो इमारत होती. साजेदाबी या मुंबईत राहतात. त्यांनी पाचोरा येथे इन्व्हेस्टमेंट म्हणून ही तीन मजली इमारत बांधली होती. इमारतीला पावसामुळे तडे पडले होते. त्यामुळे इमारत एका दिशेने झुकून कधीही कोसळेल, अशा स्थितीत होती. खबरदारी म्हणून इमारतीतील भाडेकरू यांनी आधीच इमारत रिकामी केली होती
पाचोरा शहर व परिसरात सोमवारी सायंकाळपासूम रिमझिम पाऊस पडत होता. पावसामुळे रात्री दहा वाजता ही इमारत अचानक कोसळली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. इमारत धोकादायक असल्याने यापूर्वीच नगरपरिषदेने हा रस्ता बंद केला होता. परिसरातील आणि शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी काळजी घेतल्याने सुदैवाने हानी झाली नाही. इमारत कोसळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
