मातृदिनी आईसह चिमुकल्याचा बुडून मृत्यू

गोदावरी नदी पात्रात धुणे धुण्यासाठी गेलेल्या आईसह चिमुकल्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गेवराई तालुक्यातील संगम जळगाव येथे रविवारी घडली. पाच वर्षांचा मुलगा बुडत असल्याचे पाहून आईने पाण्यात उडी घेऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोहता येत नसल्याने दोघांचाही मृत्यू झाला. मातृत्वदिनीच ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

संगम जळगाव येथील पल्लवी गोकुळ ढाकणे (वय २६) या मुलगा समर्थ (वय ५) याला सोबत घेऊन गोदावरी नदी पात्रावर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. आई कपडे धूत असताना समर्थ खेळता खेळता पाण्यात बुडू लागला. डोळ्यादेखत मुलगा बुडत असल्याचे पाहून पल्लवी ढाकणे यांनीही पाण्यात उडी घेतली. मात्र पाणी जास्त असल्याने आणि पोहता येत नसल्यामुळे माय-लेकराचा बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *