करोनाच्या संकटकाळी राज्यात आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण झाला असताना आरोग्य सेवकांची सुद्धा वानवा असल्याचे चित्र सध्या शिर्डी सह राज्यात असताना करोना काळात नर्सिग महाविद्यालय बंद असताना परिचारिकेचे द्वितीय वर्षांत शिक्षण घेत असलेल्या शिर्डी येथील पायल घोडके या तरुणीने शिर्डी येथील कोविड सेंटर मध्ये विना मोबदला कोविड बाधित रुग्णांची सेवा करण्याची इच्छा शिर्डीचे प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे एका लेखी अर्जाद्वारे करताच तिला त्यांनी तत्काळ कोविड रुग्णालयात काम करण्याची संधी दिल्याने या मुलीचा आनंद गगनात मावेनासा झाला.
सगळीकडे रुग्णालय असो अथवा कर्मचारी या महामारीकडे बऱ्याच जणांनी संधी म्हणून आणि बक्कळ अर्थार्जनाचे साधन म्हणून पाहिल्याचे चित्र सर्वत्र अनुभवायला येत असतानाच अशातच या संधिसाधू दुनियेत शिर्डीतील पायल घोडके या मुलीने समाजसेवेचे काम केले आहे. शिर्डीतील लक्ष्मीनगर येथे राहणारी एका गरीब कुटुंबातील ही मुलगी पायल रामेश्वर घोडके हिने नर्सिगमध्ये प्रवेश घेतला परंतु करोनामुळे महाविद्यालय बंद असल्याने तिला घरी थांबावे लागले. दुसऱ्या वर्षीचे शिक्षण थांबल्याने तिच्यातील शिकण्याची इच्छा तिला स्वस्थ बसू देत नव्हती. अशातच तिने शिर्डीतील शिवसेना नेते कमलाकर कोते यांच्याशी संपर्क केला आणि साईबाबा संस्थानच्या कोविड सेंटर मध्ये काम करण्याची संधी मिळवून द्या, अशी विनंती केली. कमलाकर कोते यांनीही तातडीने प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांची भेट घेत त्यांना ही गोष्ट सांगितली. त्यांना सुद्धा तिचे कौतुक वाटले. प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी वेळ न दडवता राहत्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांच्याशी संपर्क साधत तिला कोविड सेंटरमध्ये रुजू करण्याची विनंती केली. तहसीलदार कुंदन हिरे यांनी तातडीने निर्णय घेत तिला शिर्डी येथील कोविड सेंटर मध्ये रुजू करून घेतल्याचा आदेश काढून तिला फोन करून शुभेच्छा दिल्या. यावर त्या मुलीचा आनंद गगनात मावेनासा झाला.
