राज्यात कोरोना विषाणूचा धोका वाढत आहे. (Coronavirus in Maharashtra) मोठ्याप्रमाणात कोरोनाचा फैलाव होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. दरम्यान, अनेक जण मदतीसाठी पुढे येत आहेत. कोविड-19 साठीच्या विशेष मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी सात लाख रुपयांची मदत दिली आहे. या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. कोविड-19 विरुद्धच्या लढाईत राज्य शासनास आर्थिक मदत देऊ इच्छिणाऱ्यांसाठी कोविड-19 मुख्यमंत्री सहायता निधी स्थापन करण्यात आला आहे. सरकारडून मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री सहायता या विशेष निधीसाठी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून ही मदत प्राप्त झाली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या निधीत मदत देऊन कोरोना विरुद्धच्या लढण्यासाठी सहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यानिमित्ताने केले आहे.
गेल्या 24 तासांत तर भारतात तब्बल 4 लाख 1 हजार 993 नवे करोनाबाधित सापडले आहेत. 24 तासांत 4 लाखांहून जास्त करोना रुग्ण सापडलेला भारत हा जगातला पहिलाच देश ठरला आहे. दरम्यान, राज्यात काल 62919 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. शुक्रवारी नवीन 69710 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 368976 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 662640 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 84.6 टक्के झाले आहे.
