‘सीटीस्कॅन’अंतर्गत रुग्णांची आर्थिक पिळवणूक

पालघर-बोईसर परिसरातील खासगी सीटीस्कॅन केंद्रांकडून रुग्णांची लूट सुरू आहे. सीटीस्कॅन करणाऱ्या केंद्रांची कमतरता असल्याने त्याचा गैरफायदा घेत शासनमान्य दराऐवजी अधिक मूल्य घेतले जात असल्याची तक्रार रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून सुरू आहे. मात्र या प्रकाराकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

राज्य शासनाने सप्टेंबर २०२० मध्ये काढलेल्या परिपत्रकामध्ये सोळा प्लेटच्या सीटीस्कॅनला दोन हजार रुपये आकारणी करणे अपेक्षित आहे. असे असतानाही बोईसर व पालघर येथे एचआर सीटी अर्थात हाय रिझोल्युशन सीटीस्कॅन करणाऱ्या दोन-तीन केंद्रांतून सर्वसाधारण करोना रुग्णांकडून ३५०० रुपये आकारणी होत आहे.

पालघर तालुक्यातील सीटीस्कॅन केंद्रांमध्ये विक्रमगड तालुका तसेच इतर भागातूनदेखील रुग्ण मोठय़ा प्रमाणात येत असून या सर्व रुग्णांची लूट होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.

शासकीय दरपत्रकाऐवजी वाढीव दराने सीटीस्कॅन आकारणी केलेल्या सर्व रुग्णांचा तपशील शासकीय आरोग्य व्यवस्थेकडे उपलब्ध असून या सर्व रुग्णांकडून नियमबा उकळण्यात आलेली अधिकची रक्कम परत करावी अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, बोईसरमध्ये काही सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्रित येत सीटीस्कॅन केंद्रांना शासकीय नियमानुसार दर आकारणी करण्याचे निवेदन केल्यानंतर या केंद्रांनी सकारात्मकता दाखवत दर कमी करू असे सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *