राज्यातील आरोग्य प्रशासन कोविडशी झुंजत असताना दुसरीकडं रुग्णालयांतील अपघातांची मालिका सुरूच आहे. नाशिकमधील ऑक्सिजन गळती, विरारच्या हॉस्पिटलमधील आगीच्या घटनांनंतर आता डोंबिवलीतील कोविड रुग्णालयात लिफ्ट कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
डोंबिवलीमधील कल्याण शीळ रोड येथील एस एस टी वैद्यरत्न या कोविड रुग्णालयात हा प्रकार घडला. अपघातग्रस्त लिफ्टमध्ये एकूण चौघे जण होते. त्यात एक रुग्ण होता. तांत्रिक बिघाड झाल्यानं पहिल्या माळ्यावरून ही लिफ्ट खाली कोसळली. त्यात हे चौघे जखमी झाले. सुदैवानं त्यांचा जीव वाचला. तांत्रिक बिघाडामुळं हा प्रकार घडल्याचं रुग्णालय प्रशासनानं म्हटलं आहे.
तांत्रिक बिघाडामुळं ही दुर्दैवी घटना घडली. याबाबत देखभाल दुरुस्ती विभागाला कळवलं आहे. या रुग्णांवरील उपचाराचा संपूर्ण खर्च आमच्याकडून केला जाईल, असं रुग्णालयानं स्पष्ट केलं आहे.
