पगाराचे पैसे मागण्यासाठी गेला आणि झाली बेदम मारहाण

पगाराचे शिल्लक असलेले पैसे आणण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला कारखानामालकाने बेदम मारहाण केल्याची घटना भिवंडीमध्ये घडली. या मारहाणीत हा व्यक्ती जबर जखमी झाला आहे. त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून कारखानामालकावर भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक झालेली नाही.

मारहाणीचा हा प्रकार १६ एप्रिल रोजी नालापार येथील आरोपी इरफान काझी याच्या लूम कारखान्याजवळच घडला होता. भिवंडीतील हंडी कंपाउंड परिसरात राहणारा आयुब अन्सारी याचा मोठा भाऊ इक्बाल अन्सारी हा त्याचा पूर्वीचा कारखानामालक काझी याच्याकडे पगाराचे बाकी असलेले चार हजार रुपये आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी ‘तू मला न सांगता काम सोडून का गेलास’ असे बोलून काझी याने इक्बालला शिविगाळ केली. ‘माझा पगार द्या, मला तुमच्याकडे काम करायचे नाही’ असे इक्बाल बोलताच काझी याने त्याच्या डोक्यावर जोरदार ठोसा मारला. तसेच, त्याला खाली पाडून आरोपीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत इक्बाल याच्या डोक्यातील अंतर्गत भागात गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने तो बेशुद्ध झाला. तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तो बोलण्याच्या स्थितीमध्ये नसल्याने या प्रकरणी त्याच्या भावाने पोलिस ठाण्यात धाव घेत काझी याच्याविरुद्ध तक्रार केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *