शहरातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने ठोस पावले उचलली असून त्याचाच एक भाग म्हणून शहरातील मॉलमध्ये प्रवेशासाठी शीघ्र प्रतिजन चाचणी सक्तीची केली आहे. या चाचणीत नकारात्मक अहवाल आलेल्या व्यक्तींनाच मॉलमध्ये प्रवेश दिला जात आहे. तर सकारात्मक अहवाल आलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल केले जात आहे. यामुळे चाचणी सक्तीच्या भीतीमुळे मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत २५ ते ३० टक्क््यांनी घट झाल्याची माहिती समोर आली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील करोना रुग्णांची संख्या एक हजाराच्या पार गेली असून हा संसर्ग रोखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून उपाययोजना आखण्यात येत आहेत. शहरातील मॉलमध्ये मोठ्या संख्येने नागरिक खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने मॉल व्यवस्थापकांना काही नियम आखून दिले आहेत. तसेच मॉलमध्ये प्रवेशासाठी शीघ्र प्रतिजन चाचणी गेल्या आठवड्याभरापासून सक्तीची केली आहे. मात्र, त्याचा परिणाम मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या संख्येवर झाल्याचे दिसून येत आहे. मॉलच्या प्रवेशद्वारावर होत असलेल्या शीघ्र प्रतिजन चाचणीमुळे ग्राहकांनी मॉलकडे पाठ फिरवली असून ग्राहकांच्या संख्येत २५ ते ३० टक्क्यांनी घट झाली आहे.
पाच ते सहा महिन्यांपूर्वी करोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्यानंतर मॉल सुरू करण्यात आले होते. त्यामुळे मॉलचे अर्थचक्र रुळावर येत असतानाच आता मॉलला करोनाच्या दुसरा लाटेचा फटका बसू लागल्याचे चित्र आहे.
