मोखाडय़ात आश्रमशाळेतील १३ विद्यार्थी करोनाबाधित

मोखाडा तालुक्यातील कारेगाव येथील सरकारी आदिवासी आश्रमशाळेतही करोनाचा शिरकाव झाला आहे. येथील  १३ विद्यार्थ्यांना तसेच एका कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आश्रमशाळा प्रशासन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यांना उपचारासाठी जव्हारला हलविण्यात आले आहे.

जव्हार तालुक्यातील हिरडपाडा, विनवळ आणि पालघर तालुक्यातील नंडोरे येथील आश्रमशाळांमध्ये बहुसंख्येने विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाल्याची घटना ताजी असतानाच, मोखाडा तालुक्यातील कारेगाव सरकारी आश्रमशाळेतही करोनाचा शिरकाव झाला असून  १३  विद्यार्थी बाधित झालेले आहेत. त्यांना आवश्यक उपचारासाठी जव्हारला पाठविण्यात आले असल्याचे आश्रमशाळा प्रशासनाने सांगितले आहे.  येथील  ६  मुलांपैकी १ विद्यार्थी हा कारेगाव आश्रमशाळेत मुक्कामी होता, तर इतर ५  विद्यार्थी हे तालुक्यातील नाशेरा, बेलपाडा, कुर्लोद, बोटोशी आणि राजेवाडी येथून जाऊन आश्रमशाळेत आले होते. हीच परिस्थिती मुलींच्या बाबतीतही झाली असून यातील  १ विद्यार्थिनी वगळता इतर तिघी करोळ — पाचघर, काष्टी आणि पोऱ्याचापाडा येथून आश्रमशाळेत दाखल झाले होते. यातील  १०  विद्यार्थी हे निवासी होते, तर इतर  ३ विद्यार्थी हे अनिवासी असून १ महिला कर्मचारी हीदेखील कारेगाव येथून गावातून येऊन जाऊन सेवा देत होती.   जिल्ह्यातील आश्रमशाळांमधून करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने  २२  मार्चपासून ९  वी व  ११  वीचे वर्ग बंद करण्यात आले आहेत. तर   १०  वी व  १२  वीचे विद्यार्थ्यांना ऐच्छिक प्रवेश केला आहे. त्याशिवाय करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पालघर यांनी आश्रमशाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *