पुण्यात दररोज ३ हजारांवर रुग्ण; महापालिकेनं घेतला ‘हा’ निर्णय

राज्यात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मुंबई व पुणे जिल्ह्यात रुग्णवाढीचा वेग सर्वाधिक आहे. पुण्यात मागील काही दिवसांपासून दररोज तीन हजारांहून अधिक रुग्ण आढळत असल्यानं प्रशासन सतर्क झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेनं जम्बो रुग्णालय पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. रुग्णसंख्या याच गतीनं वाढत राहिल्यास येत्या काळात उपचारांच्या सुविधा कमी पडू शकतात. हे लक्षात घेऊन जम्बो रुग्णालय पुन्हा सुरू करण्यात आलं आहे. ऑक्सिजन खाटांची संख्या वाढवण्यात येत आहे. २३ हजार सक्रिय रुग्णांपैकी ८५ टक्के रुग्ण स्वत:च्या घरी विलगीकरणात आहेत, ही दिलासादायक बाब आहे, असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.

‘दररोज १५ हजार चाचण्या आणि २० हजार लसीकरण करून करोना विरोधात प्रशासन सज्ज आहे. चाचणी आणि लसीकरणाचे प्रमाण पुण्यात सर्वाधिक आहे. गरज पडल्यास खाटांची संख्या वाढवण्यात येईल. त्यासाठी खासगी रुग्णालयांनी आधीप्रमाणे सहकार्य करावे. पुण्यात लॉकडाउन नसेल मात्र आणखी कडक निर्बंध काय घालता येतील यावर विचार सुरू आहे,’ असंही मोहोळ यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *