कर्जाच्या बहाण्याने १००हून अधिक जणांची फसवणूक, ११ वर्षांनी झाली शिक्षा

फसवणूक करणाऱ्या तिघांना ३ वर्षांची शिक्षा आणि ५ हजार रुपये दंड सुनावण्यात आला. अचलपूर न्यायालयाचे न्यायाधीश एस. टी. सहारे यांनी हा निकाल दिला. विशेष म्हणजे या फसवणूक प्रकरणाचा खटला ११ वर्षे चालला.

अंजनगाव येथील योगेश सुरेश गोतमारे व सुरेश कृष्णराव गोतमारे तसेच शिंदी बुद्रुक येथील मो. अफसर मो. सादिक या तिघांनी शिंदी बुद्रुक गावातील १०० पेक्षा अधिक नागरिकांना कर्ज मिळवून देण्याचे प्रलोभन दिले. ५० हजार रुपये कर्ज मिळवून देतो अशी बतावणी केली. पॅन कार्डचे २०० रुपये व इन्कम टॅक्स रिटर्नचे २ हजार ५०० रुपये फी असे एकूण २ हजार ७०० रुपये प्रत्येकाकडून घेतले. त्यांना पॅन कार्डही काढून दिले. त्यामुळे आपल्याला कर्ज मिळेल म्हणून अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली.

अंजनगाव येथे गोतमारे याच्या घरी चकरा मारून नागरिक कंटाळून गेले. या प्रकरणी सुनील उत्तमराव रोडे यांच्यासह ३१ जणांनी मिळून पथ्रोट पोलिसांत १८ जून २०१० रोजी फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत योगेश गोतमारे व सुरेश गोतमारे यांना त्यांच्या काठीपुरा येथील निवासस्थानी जाऊन अटक केली होती. तर मो. अफसर फरार झाला होता.

हे प्रकरण अचलपूर न्यायालयात दाखल करण्यात आले होते. अकरा वर्षे चाललेल्या या खटल्यात अनेक साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे अॅड. चक्रधर हाडोळे यांनी युक्तिवाद केला. सर्व साक्षीदार तपासल्यानंतर या प्रकरणात तिन्ही आरोपींना दोषी ठरवून तिघांनाही तीन वर्षे शिक्षा व ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. आरोपी पक्षातर्फे ॲड. खोजरे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *